स्क्रीनच्या प्रकाशात हरवत चाललेला सामूहिक आनंद!!
माणूस हा स्वभावतः सामाजिक प्राणी आहे, असे आपण नेहमी म्हणतो. त्याच्या आनंदाचे, दुःखाचे, यशाचे आणि अपयशाचे खरे मोल तेव्हा निर्माण होते जेव्हा ते इतरांसोबत वाटले जाते. एकत्र हसण्यात, गप्पा मारण्यात, सण साजरे करण्यात किंवा एखादा चित्रपट पाहताना अनुभवलेल्या सामूहिक भावनांमध्ये मानवी जीवनाचे एक वेगळेच सौंदर्य दडलेले असते. परंतु गेल्या काही वर्षांत, विशेषतः २०२० नंतर, या सौंदर्याला एक अदृश्य ग्रहण लागल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या काळाने माणसाला घरात राहण्याची सवय लावली.
सुरुवातीला ही परिस्थिती अपरिहार्य होती. परंतु त्याच काळात डिजिटल जगाने अभूतपूर्व वेगाने विस्तार घेतला.
ओटीटी प्लॅटफॉर्म्स, यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि असंख्य डिजिटल माध्यमांनी आपल्या वेळेवर
आणि लक्षावर कब्जा करायला सुरुवात केली.
जग आपल्या हातातील छोट्याशा स्क्रीनमध्ये सामावले गेले; पण या प्रक्रियेत आपले स्वतःचे जग मात्र संकुचित होत गेले.
पूर्वी मनोरंजन ही एक सामूहिक प्रक्रिया होती. कुटुंब एकत्र बसून दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहायचे.
मित्रमंडळी चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घ्यायची.
एखाद्या विनोदावर सर्वजण एकत्र हसायचे.एकत्र बसून हाॅरर सिनेमा किंवा कॉमिडी कन्टेन्ट असो,
त्या क्षणांमध्ये केवळ मनोरंजन नव्हते, तर एकमेकांशी जोडले जाण्याची प्रक्रिया होती.
आज मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आवडीच्या कंटेंटमध्ये गुंतलेली आहे.
एकाच घरात चार व्यक्ती असतील, पण चारही जण चार वेगळ्या डिजिटल विश्वांत वावरत असतात.
या बदलाचा सर्वात मोठा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर झाला आहे. संवादाची साधने वाढली, पण संवाद कमी झाला. संपर्क वाढला, पण सहवास कमी झाला.
आपण एकमेकांच्या पोस्ट्स पाहतो, स्टोरीजवर प्रतिक्रिया देतो, पण एकमेकांच्या डोळ्यांत पाहून बोलण्यासाठी वेळ काढत नाही.
माणसांशी असलेली प्रत्यक्ष नाती हळूहळू आभासी संबंधांमध्ये रूपांतरित होत आहेत.
डिजिटल माध्यमांची रचना अशी आहे की ती सतत आपल्या लक्षासाठी स्पर्धा करत असतात.
काही सेकंदांच्या रील्स, सतत बदलणारा कंटेंट आणि क्षणाक्षणाला मिळणारे नवे उत्तेजन यामुळे संयम,
एकाग्रता आणि प्रतीक्षा करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. परिणामी,
दीर्घकाळ एकत्र बसून एखादा चित्रपट पाहणे, निवांत गप्पा मारणे किंवा कोणासोबत शांतपणे वेळ घालवणे अनेकांना कंटाळवाणे वाटू लागले आहे.
ही केवळ सवयीतील बदलाची बाब नाही; ती मानवी अनुभवाच्या स्वरूपात होत असलेली एक खोल सामाजिक उलथापालथ आहे.
प्रश्न तंत्रज्ञान चांगले की वाईट हा नाही. तंत्रज्ञान हे साधन आहे; प्रश्न त्याच्या वापराचा आहे.
जेव्हा साधन माणसाला जोडण्याऐवजी वेगळे करू लागते, तेव्हा चिंतनाची गरज निर्माण होते.
आपण माहितीच्या महासागरात पोहत आहोत, पण भावनिक जवळीकच्या किनाऱ्यापासून दूर जात आहोत.
आपल्याकडे मनोरंजनाची असंख्य साधने आहेत, पण आनंदाचे सामूहिक क्षण मात्र दुर्मिळ होत चालले आहेत.
कदाचित आजच्या काळात सर्वात मोठी गरज नवीन अॅप शोधण्याची नाही, तर जुने संवाद पुन्हा जिवंत करण्याची आहे.
मित्रांना अचानक भेटण्याची, कुटुंबासोबत मोबाईल बाजूला ठेवून वेळ घालवण्याची,
एखादा चित्रपट किंवा सामना एकत्र पाहण्याची आणि माणसांमध्ये पुन्हा गुंतण्याची गरज आहे.
कारण मानवी जीवनाचा खरा अर्थ स्क्रीनवर दिसणाऱ्या असंख्य दृश्यांमध्ये नसून, आपल्या माणसांसोबत अनुभवलेल्या जिवंत क्षणांमध्ये असतो.
प्रगतीच्या या वेगवान प्रवासात आपण बरेच काही मिळवले आहे; परंतु मिळवताना नकळत काय हरवत आहे, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.
कारण समाज फक्त इंटरनेटने जोडला जात नाही; तो माणसांनी माणसांशी जोडलेला असला पाहिजे.
--------प्रतिक --------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा