कोकणातील गावातील शिमगा उत्सव – परंपरा, मिरवणूक आणि आठवणी
जसे मार्च जवळ येतो, तसं महाराष्ट्रात—विशेषतः कोकणात—शिमग्याच्या जल्लोषाची तयारी सुरू होते. हा सण परंपरेशी घट्ट निगडित असून, विशेषतः गावांमध्ये पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या रुढी-परंपरांसह मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
आमच्या लहानपणी, जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा शिमगा हा आमच्यासाठी खूप आनंदाचा सण असायचा.शाळेला सुट्टी मिळायची. त्यावेळी हिवाळा नुकताच संपत असायचा आणि वातावरण आल्हाददायक असायचं. गावात उत्सवाची सुरुवात देऊळवाडीत, म्हणजेच चावट्यामध्ये (मंदिरासमोरील जागा) मंदिरासमोर होळी पेटवून होत असे. संपूर्ण गाव या पहिल्या होळीच्या वेळी एकत्र जमायचा, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शिमग्याचा प्रारंभ व्हायचा.
शिमग्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पालखी मिरवणूक. ही मिरवणूक गावाच्या देऊळातून निघायची. पालखी घेऊन जाणाऱ्या लोकांना खेळी म्हणतात, आणि त्यांची एक वेगळीच पारंपरिक वेशभूषा असते. निवडलेला खेळी काही विशिष्ट नियम पाळतो—म्हणजे त्याने मांसाहार टाळावा लागतो आणि सहसा तो १० ते १४ वयोगटातील मुलगा असतो. तो नऊवारी साडी परिधान करतो, पायात घुंगरू, कपाळावर टिळा, आणि हातात बांगड्या असतात.हे दृश्य पाहायला छान वाटतं.

ही पालखी एकट्या गावापुरती मर्यादित नसून, ती जवळपासच्या ५-६ गावांमध्ये नेली जाते आणि शेवटी परत आपल्या गावी येते. पालखी आल्यावर खेळी प्रत्येक घरासमोर जाऊन पारंपरिक गीते गात आणि पालखी चा सन्मान करत. गावकरी त्यांचे स्वागत करत असत आणि त्यांच्याकडून आशिर्वाद घेत असत.
रात्री, मुले आणि मुली कुकडी-कू नावाचा खेळ खेळायचे. हा लपाछपीसारखा खेळ आहे आणि यात ६ ते २१ वर्षे वयोगटातील सर्वजण सहभाग घेत असत. त्यामुळे संपूर्ण गाव या खेळाने उत्साही होऊन जायचं.
दिवसा गावाच्या मध्यभागी "शक्ती - तुरा" डबल बारी हा कार्यक्रम व्हायचा. गावकरी मोठ्या प्रमाणावर येथे जमून या कार्यक्रमाचा आनंद घेत असत. त्याचवेळी, गावाच्या दक्षिण भागात असलेल्या लाईब्ररीच्या पटांगणावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जात. तालुक्यातील विविध गावे आपल्या संघासह या स्पर्धेत भाग घेत.
मात्र, बहुतेक वेळा गावाचीच टीम जिंकायची!
रात्रीच्या वेळी नृत्य, नाटक, आणि विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभासारखे सांस्कृतिक कार्यक्रम केले जात.
शिमग्याचा शेवटचा दिवस पहाटे ५ वाजता व्हायचा. त्या वेळी चावट्यामध्ये शेवटची होळी पेटवली जायची. पालखी खांद्यावर उचलून संपूर्ण गावकरी त्या होळीभोवती नाच करत. त्यानंतर, नारळ अर्पण करून आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जात असे. होळी जळून गेल्यानंतर काळी राख उरते. गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती ही राख उचलून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर लावायचा. हे त्या व्यक्तीसाठी शुभ मानलं जायच, आणि यासोबतच हा सण समाप्त व्हायचा!!
वाचल्याबद्दल धन्यवाद!
लेखक: प्रतिक देवराज महाडिक
ग्रामीण जीवन, रहस्य आणि मनोवैज्ञानिक कथा हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.
अधिक कथा वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट देत रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा