मळकंडी आणि गूढ

मळकंडी आणि गूढ: Part 1

भवनवाडी हे गाव हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सान्निध्यातलं एक शांत ठिकाण. या गावाचं हृदय मळकंडी नावाच्या नदीच्या जागेच्या वळणाशी जोडलेलं होतं—एक अशी जागा जिथे पिढ्यान्पिढ्या मुलं पोहत शिकली, खेळली, आणि मोठी झाली.

दर शनिवार-रविवार, वयाच्या तीन-चार वर्षांपासून ते वीस-बावीस वर्षांच्या तरुणांपर्यंत सगळी मुलं तिथे पोहायला यायची. नदीच्या दुसऱ्या बाजूला एक सपाट मैदान होतं, जिथून धावत जाऊन मुलं थेट नदीत उडी मारत.

पाण्यात मुलं दहीहंडी खेळायची, हबाडुबीचा खेळ रंगायचा, तर काही वेळा चक्क क्रिकेटचे सामनेही तिथेच भरायचे.

पण मळकंडीचे दोन चेहरे होते.

दुसऱ्या बाजूला चिखल, काटेरी गवत, आणि मोठमोठे दगड होते—जिथे गावातील मोठी माणसं आपली बैलं आणि म्हशी धुण्यासाठी येत.

गावामध्ये मळकंडीच्या नावाबद्दलही बरीच रहस्यं होती. जुन्या काळात तिथे हातभट्टी—देशी दारू बनवायची एक लहानशी भट्टी होती. कदाचित त्याच्यामुळे हे नाव पडलं असेल.

पण कुणालाही कल्पना नव्हती की त्या नदीच्या तळाशी काय लपलं होतं.

तो मुलगा जो पाण्यात गेला…

गावातल्या सगळ्या मुलांमध्ये शेखर हा सगळ्यांचा लाडका आणि हुशार होता. उंच, देखणा आणि मनमिळाऊ, तो सगळ्यांचा नेता वाटायचा. त्याचे वडील एक शासकीय कर्मचारी होते, गावात प्रतिष्ठित व्यक्ती होते. आई साधी, शांत स्वभावाची, पण तिने घरात मायेचं वातावरण निर्माण केलं होतं.

त्या दिवशी शेखर शाळेतून धावत घरी आला.

आईशी न बोलताच त्याने शाळेची बॅग कोपऱ्यात फेकली आणि थेट मळकंडीच्या दिशेने पळ काढला.

तेथे आधीच मुलांचा गजबजाट सुरू होता.

हवा, पाण्याच्या स्पर्शाने गार झाली होती. पोरं उड्या मारत होती, हास्याचे आवाज घुमत होते. शेखरने सूरळी मारत उडी घेतली—त्याच्या प्रसिद्ध शैलीत.

तो या उडीचा मास्टर होता. पाणी फोडत तो वाऱ्यासारखा उतरायचा, आणि मित्र त्याला पुन्हा पुन्हा तसं करायला सांगायचे.

पण त्या दिवशी, एका उडीमध्ये, तो तळाशी गेला… आणि पुन्हा वर आलाच नाही.

मळकंडीचं गूढ उलगडतं…

शेखर बऱ्याच वेळानेही वर आला नाही, तेव्हा पहिल्यांदा कुणाल आणि समीरला वाटलं की तो फक्त मस्करी करत असेल.

पण तीन मिनिटं झाली.तरीही तो वर येईना.

आता मात्र त्यांना घाम फुटला.

कुणाल आणि समीरने पाण्यात उड्या मारल्या, त्याला शोधू लागले. पण शेखर नाहीसा झाला होता.

गावकऱ्यांना बोलावण्यात आलं. काही वेळातच संपूर्ण गाव मळकंडीच्या काठावर जमलं. त्याचे वडील धावत आले, आईचा आकांत कानी पडत होता.

आणि मग, एक वृद्ध व्यक्ती पुढे आली.

दादू बाबा—गावातले सर्वात वयोवृद्ध, ८५ वर्षांचे. त्यांनी काठावरून पाण्याकडे पाहिलं, आणि काहीतरी आठवल्यासारखं त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं.

"हे आधी झालंय…" त्यांनी पुटपुटत म्हटलं.

त्यांना लहानपणी आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली.

"मळकंडीच्या तळाशी एक खोल खड्डा आहे. जो फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच उघडतो. ज्या रक्ताची ओळख त्याला असते, फक्त त्यांनाच तो ओढून नेतो."

तेवढ्यात, गावकऱ्यांना दूर कुठेतरी एका झुडुपामध्ये काहीतरी दिसलं.

तो शेखर होता.

तो वेगळा झाला होता…

शेखर शुद्धीवर आला, पण वेगळाच दिसत होता.

तो रडत होता, आणि त्याचा हात त्याच्या च्या मांडीवर होता. तिथे एक लहानसा कट दिसत होता. पण खरी भीती त्याच्या डोळ्यांत होती.

काहीतरी भयंकर घडलेलं होतं.

आणि मग, लोकांनी पाहिलं.

त्याच्या शरीरावर मोठमोठे पिवळे बेडूक बसले होते.

ते हलतही नव्हते.

आवाजही करत नव्हते.

ते फक्त… त्याच्या अंगावर चिकटलेले होते.

बाबा दादू गुढग्यावर कोसळले.

"हे खरं आहे… हे खरंच आहे…" असं ते पुटपुटत राहीले.

त्या रात्री, शेखरला झोपच लागली नाही.अखेर स्वतःशीच झुंज देत तो झोपला.

त्याच्या कानात पाण्याचा आवाज घुमत राहिला. डोळे मिटले की पुन्हा तो त्या गूढ जागेत बुडतोय, असं त्याला जाणवायचं.

पण खरी परीक्षा दुसऱ्या दिवशी सुरू झाली.

गावभर चर्चा

गावात सगळीकडे कुजबुज सुरू झाली.

"शेखर बुडाला होता… पण परत आला."

"त्याच्या शरीरावर पिवळे बेडूक होते!"

बाजारात त्याच्याकडे अनोळखी नजर टाकल्या जायच्या. चहाच्या टपरीवर गप्पा रंगायच्या.

लहान मुलं तर त्याच्यापासून दूर राहू लागली.

एका लहानग्याने बोट दाखवत पुटपुटलं, "भूत…भूत....

तो पाण्यातून परत आलाय."

शाळेतला बदल

शाळेत शेखर नेहमी हुशार असायचा. पण त्या दिवशी, त्याने वर्गात पाऊल टाकताच सगळं काही बदललं होतं.

मुलं त्याच्या आजूबाजूला बसणं टाळत होती.

खेळाच्या सुट्टीत त्याने एकटं बसणं पसंत केलं. डोळे मिटले की, त्याला पुन्हा तोच अनुभव आठवत होता.

आणि मग, त्याच्या लक्षात आलं…

बेडूक.

ते सगळीकडे होते.

देवळाच्या पायऱ्यांवर. घराच्या दरवाज्याजवळ. एकदा तर त्याच्या शाळेच्या बॅगेत!

तेव्हा त्याला कळलं—हे संपलेलं नाही.

मळकंडीची पुन्हा हाक…

एका संध्याकाळी, नदीच्या काठावर एक वृद्ध बाई बसलेली होती.

तिने शेखरला थांबवलं.

"तुला परत यायला नको होतं, लेकरा," ती कुजबुजली.

शेखर घामाघूम झाला.

त्या रात्री त्याला जाणवलं…

मळकंडी अजूनही त्याला बोलवत होती.

शेखरच्या घटनेचा गावाच्या जीवनावर खोलवर परिणाम

झाला.

मलकांडी आता धोकादायक जागा ठरते – शेखरच्या घटनेनंतर पालक आपल्या मुलांना नदीपासून दूर राहण्याची ताकीद देतात, विशेषतः खोल भागांपासून. काही जण मुलांना तिथे जाण्यासच मनाई करतात.

जुन्या कथा पुन्हा जिवंत होतात – गावातील वृद्ध लोक जुने किस्से सांगायला लागतात—अशाच प्रकारे हरवलेल्या किंवा बदलून आलेल्या लोकांच्या कथा.

दादू बाबा आता गावासाठी एक महत्त्वाचा व्यक्ती बनतो, कारण लोक त्याच्याकडून उत्तरं शोधू लागतात.

धार्मिक व आध्यात्मिक प्रतिक्रिया – काही गावकरी शेखरला "नदीने निवडलेला" समजतात, तर काही त्याला अपवित्र मानतात. काही लोक त्याच्या शुद्धीकरणासाठी विशेष विधी घडवतात, तर मंदिरात नदीला शांत करण्यासाठी विशेष पूजा होतात.

शेखरचा सामाजिक एकटेपणा आणि बदलते नातेसंबंध:-

भीती आणि आदर यांचं मिश्रण – काही लोक शेखरला वेगळ्या नजरेने पाहू लागतात—कोणी त्याला विशेष समजतो, तर कोणी टाळू लागतो, जणू काही त्याच्यात काहीतरी वेगळं आहे.

त्याच्या कुटुंबावरुन कुजबुज सुरू होते – गावात चर्चा रंगतात. त्याची आई अतिशय काळजी घेऊ लागते, तर त्याचे वडील—जे तर्कशुद्ध विचार करणारे आहेत—सगळं विसरून पुढे जायला भाग पडतात.

मित्र बदलू लागतात – शेखरचे जवळचे मित्र, जसे समीर आणि कुणाल, आधीप्रमाणे वागत असले तरी त्यांच्याही मनात भीती दाटलेली असते. हळूहळू काही मित्र त्याला टाळू लागतात.

गावात अघटित घटना घडू लागतात:-

अजून विचित्र घटना घडतात – गावभर वेगवेगळ्या ठिकाणी विचित्र पिवळ्या बेडकांची संख्या वाढते—मंदिराच्या पायऱ्यांवर, विहिरीजवळ, घरांच्या अंगणात. गायी-म्हशी मळकंडीचं पाणी पिणं टाळतात. काही लोक सांगतात की त्यांना स्वप्नात नदी आणि बेडूक दिसतात.

शेखरच्या उपस्थितीमुळे अस्वस्थता जाणवते – कुत्रे आणि जनावरे त्याच्यापासून दूर राहू लागतात. काही जण म्हणतात की पाण्यात त्याचं प्रतिबिंब वेगळंच दिसतं. लहान मुलं त्याला "भूत" म्हणू लागतात.

परंपरा आणि आधुनिकतेमधला संघर्ष वाढतो:-

काही जण वैज्ञानिक उत्तरं शोधतात, काही जण धार्मिक उपाय करतात – गावातील वृद्ध लोक शेखर आणि नदीचं शुद्धीकरण करण्यासाठी मोठा विधी करावा असा आग्रह धरतात, तर तरुण पिढी याला अंधश्रद्धा मानून विरोध करते. यामुळे गावात मतभेद वाढतात.

नदी आता केवळ नदी राहत नाही – आता मळकंडी म्हणजे केवळ पोहण्याची जागा नसून, एक रहस्य बनते. काही लोक तिथे जाऊन प्रसाद ठेवतात, भीतीने पूजा करू लागतात.

शेखर आणि मळकंडी यांच्यातली अदृश्य नाळ

नदी त्याच्याकडून काहीतरी मागते का? – काही काळानंतर शेखरला विचित्र आवाज ऐकू येतात, अज्ञात शक्तीची चाहूल लागते, आणि नदी त्याला पुन्हा बोलावते आहे असं वाटू लागतं.

तो एकटाच नाही… – गावात याआधी असं कुणाचं झालं आहे का? जर हो, तर त्यांचं काय झालं?

ही गोष्ट संपलेली नाही – गावकऱ्यांना वाटतं की हे प्रकरण संपलं, पण मळकंडी अजूनही शांत नाही. लवकरच गावाला त्या रहस्याचा सामना करावा लागेल…


मळकंडी आणि गूढ: Part 2

मळकंडी घटनेचा मोठा परिणाम शेखरच्या तसेच गावकऱ्यांच्या जीवनावर झाला होता. एका दिवशी शेखर घराच्या बाहेर आपल्या मित्रांसोबत खेळत असताना, त्याने काही वयस्कर लोकांचे बोलणे ऐकले.
सखाराम, सिताराम, सुधीर, आतेश, अजिंक्य आणि त्याचे मित्र समीर आणि कुणाल गावातील जुन्या चौथऱ्यावर दादू बाबांसोबत बसले होते आणि मळकंडीच्या इतिहासाबद्दल कुजबुजत होते. हा तोच इतिहास जो दादू बाबांच्या आजीने त्यांना सांगितला होता, जेव्हा ते सहा वर्षांचे होते.
तिने सांगितले होते की, गावाबाहेर एका छोट्या झोपडीत एक विचित्र माणूस राहायचा. त्याचे नाव बंडोपाध्याय भट असे होते, पण गावकरी त्याला "कातळीतला बाप्प्या" म्हणायचे. गावापासून दूर, एक सपाट काळ्या दगडांनी भरलेले ठिकाण होते, ज्याला लोक स्थानिक भाषेत "कातळी" म्हणायचे.
हा माणूस जवळपास पन्नास वर्षांचा होता. तो आपल्या झोपडीच्या बाहेर शेती करायचा, दररोज सकाळी प्रार्थना करायचा, आणि त्याचा आवाज ऐकायला फारच मधुर वाटायचा. पक्षी, प्राणी आणि गावकरी त्याच्या सुरेल आवाजाकडे आकर्षित होत असत आणि त्याच्या भोवती गोळा होत असत.
तो आयुर्वेदाचा जाणकार होता आणि विविध औषधी वनस्पती ओळखत होता. तो एकटाच गडद जंगलात जाऊन औषधी वनस्पती गोळा करायचा आणि त्या आपल्या झोपडीत साठवून ठेवायचा. गावातील कोणाला आजार झाल्यास तो त्यांच्यावर उपचार करायचा. त्यामुळे तो खूप प्रसिद्ध झाला होता.
काही जण म्हणत की तो हिमालयातून आलेला आहे गावाच्या भल्यासाठी, त्यामुळे सर्वजण त्याचा सन्मान करायचे.
दादू बाबांच्या आजीने सांगितले की, या माणसाकडे काही गूढ शक्ती होत्या. रात्री तो नेहमी नदीकडे म्हणजेच आज जिथे मळकंडी आहे त्या दिशेने पाहायचा.
त्याला बायको किंवा मुले नव्हती??
कुणालने हळू आवाजात विचारले!
दादू बाबा धिम्या आवाजात म्हणाले---
जेव्हा हा माणूस गावात आला तेव्हा त्याच्या सोबत त्याची पत्नी होती. पण काही दिवसांनी ती अचानक गायब झाली.
तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. जेव्हा सैनिक गावात उपचार, निवारा, पाणी आणि अन्न मिळवण्यासाठी येत असत. तो आणि त्याची पत्नी प्रामाणिक देशभक्त होते, त्यामुळे ते सैनिकांची सेवा अगदी मनापासून करत.
त्यांना एक दोन वर्षांची गोंडस मुलगी पण होती. पण काही दिवसांनी अचानक त्याची पत्नी आणि मुलगी गायब झाल्या. कोणीही सांगू शकत नव्हते की त्यांच्या सोबत काय झाले. हीच गोष्ट दादू बाबांच्या आजीने त्यांना सांगितली होती…शेखर सावधपणे गावकऱ्यांचे आणि दादू बाबांचे संभाषण ऐकत होता. तो खूपच उत्सुक झाला होता—
कातळीतला बाप्या अजून जिवंत आहे का? त्याच्या कुटुंबाचे काय झाले?
तो मळकंडीच्या दिशेने का पाहायचा?
आणि या सगळ्यामध्ये बेडकांचा काय संबंध आहे??
मळकंडीमध्ये बुडाल्यावर त्याच्या अंगावर सापडलेले बेडूक हे काही सामान्य नव्हते. त्यांच्या मांड्या खुपचं मोठ्या होत्या आणि ते विचित्र आवाज काढत होते.
त्या दिवशी शेखरच्या मनात पुन्हा असंख्य प्रश्न उमटले.
त्याने ठरवले…त्याला याबद्दल जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर मळकंडी कडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्याने एकटयानेच मळकंडीच्या काठावर जाऊन नदीत उडी मारून सत्याचा शोध घेण्याचा निश्चय केला....

मळकंडी आणि गूढ: Part 3

शेखरने ठरवले होते—त्याला मळकंडीचे सत्य शोधायचेच होते. हा विचार त्याच्या मनात घट्ट बसला होता. दुसऱ्या दिवशी तो जागा झाला, शाळेसाठी तयार झाला, पण दिवसभर त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट घोळत होती,

—दादू बाबांनी गावकऱ्यांशी बोलताना जे सांगितले होते. त्यांचे शब्द! अजूनही त्याच्या कानात घुमत होते, एखाद्या न सोडवलेल्या unsolved कोड्यासारखे.

शाळा सुटताच तो एक क्षणही न घालवता घरी पोहोचला. दप्तर कोपऱ्यात फेकले आणि थेट मळकंडीच्या दिशेने निघाला. शेतातून परतणारे गावकरी त्याला रस्त्यात भेटले. काहींनी त्याच्याकडे पाहिले, पण कोणीच काही विचारले नाही.

मळकंडीच्या जवळ पोहोचताच त्याला एक विचित्र शांतता जाणवली. हवा थांबली होती. पाण्याचा प्रवाह हलकासुद्धा हलत नव्हता, जणू काही त्याने श्वास रोखून धरला होता.

शेखरच्या शरीरातून एक थंड झटका गेला, पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले.

त्याने दीर्घ श्वास घेतला आणि एका झटक्यात पाण्यात उडी मारली.

या वेळी तो पूर्ण भानावर होता, डोळे उघडे ठेवत त्याने खोलवर पोहायला सुरुवात केली. तो त्या लहानशा बोगद्याकडे गेला जिथे काही दिवसांपूर्वी त्याच्या सोबत घटना घडली.

तिथे एक मोठा दगड त्याचा मार्ग अडवत होता. त्याने तो हाताने स्पर्श केला आणि—

ठक!

तो दगड आपोआप सरकला!

त्या छोट्या बोगद्याचा दरवाजा अचानक उघडला, आणि शेखर एकाएकी आत ओढला गेला.

त्याला काही समजायच्या आतच, तो एका विशाल दालनात उभा राहिला—पूर्ण कोरड्या ठिकाणी.

पाणी गायब झाले होते.

त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. सभोवताली प्रकाश होता, पण प्रकाश कुठून येतोय हे त्याला कळेना. काही क्षणांनी त्याच्या नजरेत ते दृश्य पडले—आणि त्याचा श्वास रोखला गेला.

त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या प्रचंड मूर्ती!

त्या साध्या मूर्ती नव्हत्या. त्या बेडकांच्या होत्या!

त्या सरळ उभ्या होत्या, सैनिकासारखी वेशभूषा करून हातात शस्त्रे धरून. त्या एकसंध दिसत होत्या, जणू काही जिवंत सैनिकच असावेत!

प्रत्येकाचा चेहरा भेदक होता, जणू त्या जाग्या होऊन कुणालातरी रोखून पाहत होत्या.

दालनाच्या टोकाला एक भव्य सिंहासन होते.

आणि त्यावर काहीतरी चमकत होते.

काहीतरी जिवंत!

शेखरने गिळगिळीत थुंकी गिळली. भीती आणि कुतूहल यांच्यात त्याचा संघर्ष सुरु झाला.

तो हळूहळू पुढे सरकू लागला. पावलांचे आवाज दालनात घुमू लागले.

तेवढ्यात—

थ्र्र्रूम्म्म!

एक खोल, गूढ आवाज पसरला.

शेखर स्तब्ध झाला.

हा आवाज त्याला परिचित वाटला. तो आठवू लागला—आणि त्याला आठवले!

‘‘हा तोच आवाज आहे...’’ तो स्वतःशी पुटपुटला. ‘‘जो मला त्या वेळी ऐकू आला होता, जेव्हा मी पाण्यात बुडालो होतो.’’

त्याच्या शरीरात एक थंड लहर पसरली.

त्याने हलक्या आवाजात विचारले, ‘‘कोण... इथे कोणी आहे का?’’

हवा जड झाली.

आणि मग—

सिंहासनाच्या मागच्या सावलीत काहीतरी हलले.

शेखरचा श्वास अडकला. तो पुढे सरकला आणि पाहतच राहिला. त्याचे डोळे विस्फारले गेले.

त्या सिंहासनावर एक प्रचंड बेडूक बसलेला होता—प्राचीन, सुरकुतलेल्या कातडीचा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या डोक्यावर केस होते. त्याचे मोठे, निर्विकार डोळे शेखरकडे रोखलेले होते.

क्षणभर शांतता पसरली.

आणि मग—

‘‘शेखर...’’

तो आवाज मानवी होता.

शेखरचा शरिराचा एक एक रोमाचं उभा राहिला.

तो आवाज पुन्हा आला—यावेळी थोडा अधिक स्पष्ट आणि गूढ.

‘‘बाळा... तू पुन्हा इथे का आलास?’’

शेखरच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले. त्याचे ओठ थरथरले आणि तो अलगद पुटपुटला—

‘‘त-तुम्ही... तुम्ही कोण आहात?’’

तो प्राचीन, विशाल बेडूक खोल श्वास घेत होता. त्याच्या डोळ्यांत शतकांपूर्वीच्या आठवणी उमटल्या. शेवटी, एका गंभीर आणि वेदनादायक आवाजात, त्याने आपली कथा सांगायला सुरुवात केली.

"खूप वर्षांपूर्वी, या गावाचा काहीही मागमूस नव्हता. हे संपूर्ण क्षेत्र आमचे होते—बेडकांच्या साम्राज्याचे. ही भूमी आमच्या घरासारखी होती, मानवांपासून मुक्त.

निसर्गाने आम्हाला एक अनोखी देणगी दिली होती—मानवी भाषा बोलण्याची क्षमता.

आमचा राजा अतिशय पराक्रमी होता—

दहा फूट उंच, शक्तिशाली आणि बुद्धिमान. तो आपल्या प्रजेला जीव लावणारा होता, त्यांच्यासाठी प्रेम आणि न्यायाने राज्य करणारा. आम्ही निसर्गासोबत समतोल राखत जगत होतो. जमिनीत सेंद्रिय घटक टिकवून ठेवणे, माती सुपीक करणे आणि कीडमुक्त ठेवणे—या सगळ्यात आम्ही निपुण होतो.

आमची मदत आसपासच्या गावांसाठी अमूल्य होती. आम्ही शेतकऱ्यांना चांगल्या शेतीसाठी मार्गदर्शन करत होतो.

आमचे आयुष्य शांततेत चालले होते… जोपर्यंत तो आला नव्हता.

शेखर शांतपणे ऐकत उभा होता..

तो??

कोण तो?? शेखर ने विचारले!!

बंडोपाध्याय भट—गावकरी ज्याला 'कातळीतला बाप्या' म्हणून ओळखायचे. प्राचीन बेडूक बोलत होता.....

तो सैनिकांच्या फौजेसोबत इथे आला. त्याच्या मनात लोभ आणि विध्वंसाची आग होती.

सुरुवातीला, तो फक्त पाहत राहिला. नंतर, मात्र रात्रीच्या अंधारात, त्याने आपले भयानक कृत्य सुरू केले.

आमच्या लोकांना तो एक-एक करून पकडू लागला. कैद करून, आम्हाला तो परदेशी व्यापार्‍यांना विकू लागला.

आणि शेवटी… त्याने अक्षम्य कृत्य केले.

आग आणि तलवारीच्या जोरावर, त्याने आमचे संपूर्ण राज्य नष्ट करून टाकले. आमची घरे बेचिराख झाली, कुटुंबे तुटून गेली.

जिथे आज मळकंडी आहे, तिथे एकेकाळी आमचे पवित्र राज्य होते—जोपर्यंत ते रक्त आणि दुःखाने विखुरले गेले नाही."

त्याचा आवाज जड झाला. तो डोकं झुकवून गप्प बसला, जणू काही हजारो वर्षांचा थकवा त्याच्या अंगावर साचला होता.

शेखर स्तब्ध होता. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले.

ही जागा... ही गूढ मळकंडी … हे पूर्वी एक संपन्न राज्य होतं?

आणि त्याचा पूर्ण विनाश झाला होता?

शेखरने गिळगिळीत थुंकी पुन्हा गिळली आणि शेवटी धीर करून विचारले,

"पण मीच का?"

"तुम्ही माझीच निवड का केली? गावातले बाकी कोणी का नाही? आणि इतक्या वर्षांत एकदाही कुणाला बोलावले नाही, मग आजच का?"

त्या प्राचीन बेडकाने पुन्हा खोल श्वास घेतला. आणि शेखरकडे रोखून पाहिले, त्याच्या डोळ्यांत अनाकलनीय गंभीरता होती.

"शेखर बाळा..." तो बोलू लागतो...


लेखक: प्रतिक देवराज महाडिक

ग्रामीण जीवन, रहस्य आणि मनोवैज्ञानिक कथा हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.
अधिक कथा वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट देत रहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

✈️ माझा पहिला विमानप्रवास: एका स्वप्नाची भरारी

कविता आणि कथा संग्रह

शेवटचा ऑफलाइन दिवस