शेवटचा ऑफलाइन दिवस

 

एका डोंगराच्या कुशीत लपलेलं गाव  होते.

ना फार मोठं, ना फार लहान. पण गेल्या काही वर्षांत या गावात एक गोष्ट बदलली होती – माणसं हरवली होती... आणि मोबाइल दिसायला लागले होते.

सोळा वर्षांचा निल, एक काळ होता जेव्हा मैदानावर धावायचा, मातीत खेळायचा, आणि झाडाखाली चित्रं काढायचा. पण आता?

तो उठायचा दुपारी. मोबाईल हातात. पाळीव जनावरासारखा मोबाईल त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला होता. झोपतानासुद्धा तेच. शाळा? अभ्यास? स्वप्नं? – सगळं ‘नेटवर्क एरर’ मध्ये हरवलं होतं.

आईवडील? तेही वेगळे नव्हते. आईच्या हातात रेसिपी व्हिडिओ, आणि वडिलांचं लक्ष रोजच्या वाईन ग्रुपवर. सगळ्यांचं आयुष्य स्क्रीनवरून चालू होतं  पण थांबलेलं होतं.

एकदा रात्री २:०१ वाजता, अचानक सगळं बंद.


लाईट गेली, मोबाईल नेटवर्क गेलं, वाय-फाय थांबलं. आधी वाटलं काहीतरी बिघडलंय. पण हे बिघाड फक्त निलच्याघरात नव्हते – संपूर्ण गावातच!

निलने खिडकीबाहेर पाहिलं – अंधार.

मोबाईलमधून सतत स्क्रीन टच करून काहीच चालत नाही हे समजल्यावर, तो वैतागून बाहेर गेला.

बाहेर... चंद्रप्रकाश होता. थंड वारा होता. आणि जे पाहून निल अवाक झाला –

माणसं होती.

शेजारी, वयस्कर आजोबा-आजीबाई, लहान मुलं, सगळे अंगणात आले होते.

कोणी गप्पा मारत होतं, कोणी गाणी गुणगुणत होतं, तर लहान मुलं लगोरी, डोंबाऱ्याचा खेळ, आणि भातुकली खेळत होती.

ज्यांनी पूर्वी मोबाईलवरून festival wishes पाठवले होते, ते आज खऱ्या उत्सवात सहभागी झाले होते.

निलला पहिल्यांदाच जाणवलं – हेच खरं आयुष्य आहे.

तो हळूहळू चालत गेला शाळेच्या जुन्या मैदानात – जे आता मुलांनी पुन्हा जिवंत केलं होतं. तिथे झाडाखाली बसलेले होते – दादु आजोबा, ज्यांना गावातील जुन्या गोष्टींचा हिरा असे म्हटले जायचे.

निल त्यांच्या शेजारी बसला.

आजोबा शांत हसले, “आज कसा वाटतोय तुला हा अंधार?”

निलने मान डोलावली, “थोडा घाबरलो… पण आता फार वेगळं वाटतं.”

आजोबा हसत म्हणाले, “आज आहे… शेवटचा ऑफलाइन दिवस.

सरकारने ठरवलंय – दरवर्षी एक दिवस, सगळं बंद. ना वीज, ना इंटरनेट. फक्त आपण आणि आपलं खरं जग.”

निल आश्चर्यचकित झाला, “पण का?”

आजोबांचं उत्तर निलच्या मनात थेट घुसलं –

“कारण आपण आपल्यालाच हरवून बसलोय. आपण स्वतःसाठी जे साधन बनवलं, तेच आपलं आयुष्य बनलं. पण माणूस मशीनपेक्षा जास्त असतो बेटा. आणि कधीकधी, शांतता आपली खरी जागा दाखवते.”

त्या रात्री निल पहिल्यांदा खूप दिवसांनी विचारात गेला.

त्याने घरी येऊन ड्रॉइंग वही उघडली. जुने रंग बाहेर काढले.

त्याच्या खिडकीतून चंद्रप्रकाश यायचा, पण आज तो प्रकाश अस्वस्थतेचा नाही, तर प्रेरणेचा होता.

सकाळी वीज परत आली. मोबाईलला नेटवर्कही आलं.

पण निलचा हात लगेच त्या फोनकडे गेला नाही.

तो बदलला होता.

आता तो फोन वापरायचा – शिकण्यासाठी, शोधण्यासाठी.

व्हिडिओ बघायचा – पण अभ्यासाचे, प्रेरणादायी.

त्याने मित्रांना सांगितलं – डिजिटल डिटॉक्सचा अनुभव.

त्याने आईबाबांना संध्याकाळी गावात फेरफटका मारायला घेऊन जायला सुरुवात केली.

आणि जेव्हा पुढचा ऑफलाइन दिवस आला –

संपूर्ण गाव तयार होतं.


लेखक: प्रतिक देवराज महाडिक
ग्रामीण जीवन, रहस्य आणि मनोवैज्ञानिक कथा हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.
अधिक कथा वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट देत रहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

✈️ माझा पहिला विमानप्रवास: एका स्वप्नाची भरारी

कविता आणि कथा संग्रह