बालपणाची अविस्मरणीय खेळांची दुनिया!!

आजच्या आधुनिक युगात, बहुतेक लोक मोठ-मोठ्या Metro cities महानगरांमध्ये राहतात. पण ज्या लोकांनी आपल्या बालपणाचा काही काळ गावात घालवला आहे, त्यांच्यासाठी गावाच्या खेळांची मजा आणि तेथील रम्य आठवणी कधीही विसरता येणार नाहीत.

आजच्या डिजिटल जगात मोबाईल आणि स्क्रीनवरील खेळांचा प्रभाव वाढला असला तरी,

आम्ही लहानपणी जे खेळ खेळलो ते साध्या गोष्टींमधूनही अपार आनंद देणारे होते. मोकळ्या मैदानी खेळांपासून नदीकिनारी धावपळ करण्यापर्यंत, गावातला प्रत्येक खेळ एक आठवण बनून मनात कायमचा कोरला गेला आहे.

आमच्या बालपणीचे आवडते खेळ

१. विटी दांडू

विटी आणि दांडू यांच्या साहाय्याने खेळला जाणारा हा खेळ कौशल्य व अचूकतेची कसोटी पाहणारा असे. दांडूने विटीला शक्य तितक्या लांब उडवणे आणि प्रतिस्पर्ध्यांनी ती पकडू नये, हेच या खेळाचे उद्दिष्ट होते.

२. गोट्या – ताकद आणि समतोलाची परीक्षा

हा समतोल साधण्याचा खेळ होता. ज्या‌चा नेम अचूक तो कधीच हारत नसे.

३. कबड्डी – संध्याकाळचा सर्वांत मोठा थरार

दर संध्याकाळी घराच्या अंगणात कबड्डी खेळण्यासाठी सगळेजण जमायचे. कबड्डीच्या घोषणांसह चालणारा हा खेळ रोमांचक असायचा. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देत त्यांच्यातून सहीसलामत परतणे, हा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असायचा.

४. डबाफेक –

या खेळात एका अंगणाच्या मधोमध प्लास्टिकची बाटली किंवा डबा ठेवला जायचा. डब्याजवळ "ज्यावर राज्य असेल तो",डोळे बंद करून उभा राहायचा. बाकीचे सगळेजण लपायचे आणि योग्य संधी मिळताच पटकन धावत येऊन तो डबा लाथ मारून दूर भिरकवायचे. हा खेळ लगोरीसारखा वाटत असला तरी त्यात वेगळाच थरार होता.

५. चोर-पोलीस – गावाच्या गल्लीबोळातील पाठलाग

ही लपाछपीसारखीच एक मस्त मजेशीर खेळायची पद्धत होती. कोणी चोर, कोणी पोलीस, आणि मग गल्लीबोळातून सैरावैरा धावण्याचा खेळ सुरू व्हायचा. पकडले जाण्याच्या भीतीने सगळेजण मस्त लपून बसायचे.

६. बॉक्स क्रिकेट आणि मोकळ्या मैदानी क्रिकेटची मजा

क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ होता. लहान अंगणात "बॉक्स क्रिकेट" खेळायचं, तर मोठ्या मैदानावर खेळण्याचा आनंद काही औरच होता. आमच्या गावात प्रत्येकात एक ‘विराट’ किंवा ‘रोहीत’ असायचाच!

७. भोवरा – गोल फिरणाऱ्या भोवऱ्याचा खेळ

भोवरा दोरीने फिरवून कधी हातात घेऊन त्याचा वेग पाहायचा हा खेळ सर्वांनाच प्रिय होता. जोर जास्त असेल, तर दुसऱ्याच्या भोवऱ्यांना उडवून लावणे. हा खेळ खेळताना गावात चांगलाच गोंधळ माजायचा.

८. सायकलिंग आणि हाताने बनवलेली खेळणी

सायकल चालवणे हा आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा भाग होता. पण सायकल मिळत नसेल, तर आम्ही स्वतःच्या कल्पनेने गाड्या तयार करायचो. खराब झालेल्या बॅटरीमधून काळा दांडा काढून त्याचे‌ axel बनवायचे आणि पांढऱ्या भागाचे छोटे छोटे चाकं तयार करून एक मोठा काठी यामध्ये बसवून आम्ही आमची स्वतःची गाडी बनवायचो!

९. उड्या मारण्याचे खेळ – धाडस आणि ऊर्जेची कसोटी

हा खेळ मुलांनी स्वतःच शोधून काढला होता. एका खेळाडूला मध्ये बसवले जायचे आणि बाकीच्यांनी त्याच्यावरून उड्या मारायच्या. प्रत्येक वेळी तो थोडा-थोडा वर उठायचा, आणि शेवटी जो उडी मारू शकत नाही तो हरायचा.

१०. बॅचकी आणि झाडावरून फळं पाडण्याचा आनंद

हे एक भन्नाट साहसी काम असायचे! बॅचकी म्हणजे घरच्या घरी बनवलेली एक साधी गुलेल. जिच्या मदतीने चिंच किंवा आंब्यांना लक्ष्य करायचं.

हे खेळ केवळ करमणुकीसाठी नव्हते, तर त्यांनी आम्हाला सहकार्य, कल्पकता, संयम आणि जिद्द शिकवली. ना महागडी खेळणी होती, ना मोबाइल—फक्त मोकळं आकाश, दंगामस्ती करणारे मित्र, आणि निखळ आनंद!

आजही जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की, ते छोटे-छोटे आनंदाचे क्षणच आयुष्यातील सर्वांत मोठी गोड आठवण बनले आहेत. कुठेही गेलो तरी, कबड्डीच्या घोषणा, क्रिकेटच्या चौकारांची मजा, आणि झाडावर हिट मारून चिंचा पाडण्याचा थरार मनातून कधीच जाणार नाही.

वाचनासाठी धन्यवाद!!!


लेखक: प्रतिक देवराज महाडिक
ग्रामीण जीवन, रहस्य आणि मनोवैज्ञानिक कथा हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.
अधिक कथा वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट देत रहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

✈️ माझा पहिला विमानप्रवास: एका स्वप्नाची भरारी

कविता आणि कथा संग्रह

शेवटचा ऑफलाइन दिवस