"गावातील रहस्यमय घोरपडाचे झाड"!!
मित्रांनो, तुम्ही कधी घोरपडाचे झाड असं ऐकले आहे का? नाव ऐकूनच उत्सुकता वाढली ना?
तुम्हाला वाटत असेल—
हे एखादे प्राणी आहे का? घोरपडीसारखे?
की असे झाड, जिथे घोरपडी राहतात?
पण तसं काही नाही, खरं तर ते एक भव्य, प्रचंड झाड आहे, जे आमच्या गावाच्या मध्यभागी उभे आहे. आणि त्याचे नाव घोरपडाचे झाड का पडले, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. कोणतीही आख्यायिका नाही, कोणतीही नोंद नाही—फक्त एक झाड, ज्याने पिढ्यान् पिढ्या आपली गूढता जपली आहे.
हे झाड गावाचे मूक साक्षीदार आहे. सुमारे ६०-७० फूट उंच, त्याच्या खोल मुळांनी जमिनीत घट्ट रुजलेले—इतके खोल की, आजूबाजूच्या घरांच्या खालीही याची मुळे पसरलेली असतील, असे म्हटले जाते.
पूर्वी, प्रवासी Migrant पक्षी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या झाडावर विसावत. मोठीं गिधाडे येथे घरटी बांधत, त्यांच्या काळ्या छायांनी झाडाला अधिक भयंकर रूप दिले होते. पोपट, विविध रंगीबेरंगी पक्षी आणि अगदी ‘तीन तोंडांचा पक्षी’ देखील इथे राहत असे.
आम्ही लहान असताना, मराठी चित्रपट माझा छकुला मधील गिधाड गँग आठवायची—महेश कोठारे दिग्दर्शित, अधिनाथ कोठारेचा चित्रपट. आम्हाला नेहमी वाटायचे की घोरपडाच्या झाडावर राहणारी गिधाडे ही खरी गिधाड गँग असेल, जी आम्हा लहान मुलांना पळवून नेईल! गंमत ना?
पण ही गंमत सर्वांसाठी नव्हती. गावकरी या झाडाला देवाचे झाड मानायचे. परंतु, याचा खरा इतिहास कोणालाच माहीत नाही. कदाचित, जर झाडाला बोलता आले असते, तर तेच आपल्याला गावाचा खरी कहाणी सांगू शकले असते—अशी गोष्ट, जी अगदी आपल्या आजी-आजोबांनाही ठाऊक नाही.
या प्रचंड झाडाखाली एक साधे चिंचेचे झाड आहे. लहान मुले त्याच्या आंबट चिंचा पाडायला व वेचायला जमायची. पण एक धोका मात्र कायम असायचा—जर कोणी दगड मारला- उंच भरकावला आणि तो घोरपडाच्या झाडावर असलेल्या महाकाय मधमाश्यांच्या पोळ्यावर लागला, तर कहर व्हायचा! मधमाश्या संतप्त व्हायच्या, आणि त्यांचे दंश भयंकर असायचे—एकदा चावले की चार ते पाच दिवस तरी वेदना व्हायच्या.आणि ज्या जागेवर चावले तिथं भयंकर सुज यायची.
आजही, घोरपडाचे झाड ताठ उभे आहे, जणू काही तेच गावाचा इतिहास सांगू इच्छित आहे. त्याच्या फांद्या हळूहळू कोमेजत चालल्या आहेत, पाने गळून पडत आहेत. निसर्गाचा नियमच आहे ना—संगळ काही नाशवंत आहे कोणीही अनंत काळ टिकत नाही.

पण तरीही, हे झाड अजूनही उभे आहे. शांतपणे सगळे पाहत… ऐकत…
आणि जर तुम्ही त्याच्या सावलीत उभे राहिलात, तर तुम्हालाही एक अनोखी, अदृश्य शक्ती जाणवेल.
काहींना ती भीतीदायक वाटते, काहींना ती शांत वाटते. पण एक मात्र नक्की—
घोरपडाचे झाड हे केवळ एक झाड नाही, तर ते एक रहस्य आहे.
वाचनासाठी धन्यवाद!
लेखक: प्रतिक देवराज महाडिक
ग्रामीण जीवन, रहस्य आणि मनोवैज्ञानिक कथा हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.
अधिक कथा वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट देत रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा