"ओवलीचं झाड आणि संचितची रहस्यपूर्ण रात्र"!!!
गावाच्या बाहेर एक जुनं ओवलीचं झाड उभं होतं, ज्याच्या फांद्या खुप मोठ्या आणि लांब होत्या. भोवती एक गूढतेचं वातावरण होतं. लोकं त्याच्या फळांविषयी अनेक अफवा ऐकवत असतं. जसे की फळांची चव कशी फसवी आहे तसेच ते खाल्याने काय परिणाम होतो आणि बरंच काही..
संचित, एक धाडसी आणि अतिउत्साही १६-१७ वर्षांचा मुलगा, आपल्या मित्रांसोबत तिथे जाऊन झाडावर चढून ओवले काढण्याचा निर्णय घेतो.
त्याचा मनात एकच विचार - त्या ओवलीच्या फळांची खरी चव कशी असेल? त्याला त्याच्या इतर मित्रांसोबत खेळताना, इतर सर्व गोष्टी विसरून, त्या गूढ झाडाकडे जाण्याची खूप इच्छा होत असे.आणि ती ओवलीची फळं जणू त्याला खुणावत असतं की ये आणि आम्हाला चाखुन बघ.या विचारानेच रविवारी सकाळी, सांचित आणि त्याचे मित्र यश, मयुर आणि दिप्तेश सर्वजण जणू काही एक साहसी मिशनवर निघाले होते. झाडाच्या दिशेने चालताना, संचित गडबड करत असलेल्या मित्रांच्या मागे उड्या मारत चालला होता.
मित्रांनी धाडसाने झाडावर चढायला सुरुवात केली, आणि संचितसुद्धा त्यांच्यासोबत झाडावर चढला. झाडाच्या फांद्या जरा कडक होत्या, पण संचित एका फांदीवर चढून झाडाच्या वरच्या भागात फळं तोडत होता. त्याच्या हातात एक केशरी रंगाच ताजं फळ लागलं, ते फळ भयानक सौम्य आणि आकर्षक होतं.लगेचच त्याने ते मित्रांना दाखवत म्हणाला... हे फळं खरंच काहीतरी वेगळं आहे,” तो हसत हसत फळं तोडत होता. त्याचवेळी गार वारा वेगाने वाहु लागला, आणि बघता बघता अचानक त्याचा फांदीवरून तोल गेला, आणि एक जोरदार आवाज झाला.

तो खाली पडला होता आणि त्याच्या पायाखाली दगड गेला, त्याचा हात जास्त ताणला आणि त्वरित मोडला.
"संचित!" मयुर ओरडला, आणि बाकीचे मित्र घाबरले. सांचितच्या चेहऱ्यावर अंधार, वेदना आणि गोंधळ होता. त्याच्या हातावर काहीतरी गंभीर दुखापत झाली होती.
सगळ्यांनी संचितला धावत जाऊन उचललं आणि घरी नेलं.गावातल्या प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर दादू आजोबांकडे नेलं. दादू, जे गावातिल सर्वात हुशार आणि अनुभवी वैद्य होते, त्याने संचितच्या हातावर प्राथमिक उपचार केले.
त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती.
“पोरी, त्याला ओवलीच्या झाडाजवळ का जाऊ दिलं?
मोठ्या व काहीशा दबक्या आवाजात दादू आजोबा संचितच्या आईला म्हणाले."
काहीतरी गडबड आहे! स्वतःशीच पुटपुटले.
त्या फळांचा प्रभाव लोकांच्या आयुष्यात खूप वेळा बदल घडवणारा असतो.
संचितच्या डोक्यात असलेल्या गूढतेने त्याला फारच घेरलं होतं.त्याला कळत नव्हते की त्याने तिकडे जाण्याचा निर्णय का घेतला. त्याच्या मनात तो विचार घुसमटत होता – "हे झाड खरंच शापित आहे का?" मनात एक घुसमटलेलं गूढ वातावरण तयार झालेलं होतं. त्याचा हात सुरवातीला दादू आजोबा ने कपड्याने बांधला, पण वेदना असह्य झाल्यामुळे आईने डॉक्टरकडे नेले व हात प्लास्टर केला, पण तो अजूनही त्या झाडाबद्दल विचार करत होता.
दुसऱ्या दिवशी, तो शाळेत गेला. मित्रांनी पाहिलं आणि विचारलं, “काय झालं, संचित?”
संचित, जरा गडबडलेला, त्याच्या प्लास्टर केलेल्या हाताने हसत म्हणाला, “कस सांगू मित्रांनो? ओवलीचं झाड, तिथे काहीतरी गडबड आहे. मी ओवलं पाडत असताना अचानक खाली पडलो.”
मित्रांच्या चेहऱ्यावर चिंता होती. “कसं काय?” यश आणि मयुर विचारत होते. "तु खूप उंच चढला होता.
संचित गडबडलेला, आणि त्याच्या मनातील गूढतेची एक नवी लाट त्याला धक्का देत होती.
शाळेतील शिक्षक त्याच्या हातावर नजर टाकून म्हणाले, “संचित, तुझा हात गंभीर जखमी दिसतो. काळजी घे आणि सावध रहा.”
पण संचितचं मन तेच विचार करत होतं – “हे झाड... त्याच्या फळांनी माझ्या जीवनात काहीतरी गडबड आणली आहे. मला त्याचं रहस्य लवकरच उलगडावं लागेल.”
तो झाडाच्या गूढतेला शोधायचं ठरवून संध्याकाळी शाळेतून बाहेर पडला.
ओवलीचं झाड आणि संचितची रहस्यपूर्ण रात्र"!!!
(भाग २)
संचित शाळेतून घरी येतो. त्याचा मोडलेला हात अजूनही प्लास्टरमध्येच असतो. तो घरात येऊन चेहरा धुतो, कपडे बदलतो आणि घराबाहेरच्या पडवीत येऊन बसतो. सूर्य कलतीला लागलेला असतो, आणि वाऱ्याने पानं हलत असतात.
काही वेळात त्याचे मित्र – यश, मयुर आणि दिप्तेश – तेथे पोहोचतात. तिघंही त्याच्या हाताची विचारपूस करतात आणि मग सगळे नेहमीप्रमाणे गप्पा सुरू करतात. हसणं, चेष्टा-मस्करी, शाळेचे किस्से…
अचानक संचितच्या हातातली एक प्लास्टिकची अंगठी, जी त्याला दोन दिवसांपूर्वी अंगणात सापडली होती – त्याच्या बोटातून निसटते आणि थेट त्याच्या प्लास्टरच्या आत जाऊन अडकते.
तेवढ्यात संचितच्या चेहऱ्यावर वेदनेची तीव्र झळ उठते. त्याचा हात जणू आतून पेटून उठल्यासारखा दुखायला लागतो. तो जोरजोरात ओरडतो, "आऽऽ! माझा हात! काही तरी होतंय! काढा रे ती अंगठी!"

त्याचे मित्र घाबरतात. त्यांना काही सुचत नाही. संचित वेदनेने विव्हळतोय, त्याच्या डोळ्यांत पाणी येतंय. त्या आवाजाने भांबावलेले मित्र काहीही न बोलता तिथून पळ काढतात.
ते थेट गावाबाहेर शंकराच्या देवळाजवळ नदीच्या किनाऱ्यावर, पेरुच्या झाडाखाली जाऊन बसतात. तिथे त्यांना अजूनच भीती वाटू लागते, कारण त्यांना वाटतं की ती अंगठी काही साधी गोष्ट नव्हती..
इकडे संचित जोरात ओरडतो, आणि आतुन आई धावत येते.
"संचित काय झालं रे?" ती घाबरून विचारते.
"आई... हात! काहीतरी आत गेलंय... जळतंय!"
आई त्याच्या प्लास्टरकडे पाहते, पण बाहेरून काहीच दिसत नाही.
ती लगेच त्याला गावातल्या दादू आजोबांकडे घेऊन जाते.
ते प्लास्टर थोडंसं उघडतात. आत थोडंफार सुजलेलं असतं, पण विशेष काही आढळत नाही.
"हात नीट सावरतो आहे, पण असं अचानक दुखायला लागणं म्हणजे… कदाचित आत काही अडकले असेल, पण आत तर काहीच दिसत नाही.
त्या रात्री संचितला झोप लागत नाही. त्याचा हात दुखतच असतो, पण डोळ्यासमोर विचित्र स्वप्नं यायला लागतात – एक काळोखी गुहा, एक खूप जुना वाडा, आणि हातात तशीच एक अंगठी असलेला माणूस, जो ओरडतोय, "ही अंगठी जागवू नकोस…!"
दुसऱ्या दिवशी सकाळी, यश, मयुर आणि दिप्तेश अजूनही घाबरलेले असतात. पेरूच्या झाडाखाली बसून ते कालचं पुन्हा पुन्हा आठवत असतात.
"तो ओरडत होता... आणि त्या अंगठीने काहीतरी केलं होतं," यश म्हणतो.
"आपण परत जायला पाहिजे. संचित आपल्या सगळ्यात जवळचा मित्र आहे. आपण त्याला असं सोडून नाही देऊ शकत," मयुर ठामपणे म्हणतो.
संध्याकाळी ते तिघं संचितच्या घरी परत येतात. संचित खिडकीतून त्यांना पाहतो आणि डोळ्यांतून अश्रू वाहतात – रागाचे नाहीत, पण वेदनेचे आणि एकटेपणाचे.
"माफ कर रे... आम्ही घाबरून गेलो होतो," दिप्तेश हळूच म्हणतो.
"काय झालंय त्या अंगठीचं? ती अजून आतच आहे का?" दिप्तेश विचारतो.
संचित हात दाखवतो – प्लास्टरच्या आतून एक थोडीशी चकाकी जाणवत असते… जणू ती अंगठी आतून चमकत असते.
तेवढ्यात संचितच्या आजोबांचे मित्र – गावातले एक वयोवृद्ध आणि थोडे विचित्र वाटणारे धोंडूबाबा – तिथं येतात आणि संचितकडे बघून म्हणतात,
"मुलांनो," ते म्हणतात, "तुमच्या सोबत जे झालं, ते काही नवीन नाही... पण ते आता थांबवायला हवं."
सगळी मुलं एकदम शांत होतात. हवा थोडी अधिक गार वाटते. बाबा हळूच बोलायला लागतात…
"हे सगळं खूप वर्षांपूर्वी झालं होतं – जवळपास शंभर वर्षांपूर्वी. आपल्या गावात एक गृहस्थ राहत असे. तो एक तापस्वी योगी होता, पण त्याचं एक रहस्य होतं – त्याच्याकडे होती एक 'संस्कारित अंगठी' – जी त्याने स्वतः तयार केली होती, काही विचित्र रचनांमधून. त्यात विशिष्ट शक्ती असायची, पण फक्त निवडक हातालाच ती स्वीकारायची."
"पण एके दिवशी ती अंगठी चोरीला गेली. आणि ती मिळाली एका स्वार्थी माणसाच्या हातात... त्याने तिचा गैरवापर केला.
अंगठीने त्याला वेडं केलं. शेवटी त्या योगीने त्याच्यावर एक श्राप टाकला – 'ती अंगठी जेव्हा पुन्हा उजेडात येईल, तेव्हा तिची शक्ती तुझ्यासारख्याच अजाण हातात जाईल आणि गावाला संकटात टाकेल.'"
"तुमच्यातलं कुणीतरी – तू, संचित – ती अंगठी परत चालवली आहेस. पण ती अंगठी अजूनही त्या माणसाच्या शापाने जागृत आहे… ती तुला पूर्णपणे ताब्यात घेण्याआधीच आपण काहीतरी केलं पाहिजे.
हे ऐकून सगळी मुलं थक्क होतात. संचितच्या चेहऱ्यावर भीतीसह एक विचित्र थकवा असतो. त्याला वाटतं, त्याच्या स्वप्नातल्या गुहा, वाडा चेहरा – हे सगळं खरंच होतं…
"पण बाबा, आपल्याला काय करावं लागेल?" यश विचारतो.
"आपल्याला ती गुहा शोधावी लागेल. जिथं ती अंगठी तयार झाली होती. त्याच जागी तिला परत नेलं तर आणि तरच तिला शांत करता येईल."
"ती गुहा कुठे आहे?" दिप्तेश विचारतो.
बाबा थोडा वेळ शांत राहतात… आणि मग अत्यंत गंभीर स्वरात म्हणतात,
"ती गुहा आहे रुपणीच्या आत. जिथं सूर्य थेट कधीच पोहोचत नाही…"
पण ते झाड ओवलीचं झाड ज्यावरून संचित पडला होता त्याचं काय? असे अनेक विचार संचितच्या मनात एकाच वेळी प्रश्न निर्माण करतात!!!
ओवलीचं झाड आणि संचितची रहस्यपूर्ण रात्र: (भाग ३)
संध्याकाळ गडद होत चाललेली असते. धोंडूबाबा संचित, यश, मयुर आणि दिप्तेश यांना गावाच्या बाहेर घेऊन चालू लागतात. सर्वांचं मन धडधडत असतं.
"रुपणीत जायचं म्हणजे जीव धोक्यात घालणं," धोंडूबाबा कुजबुजतात.
"पण जर तिथं वेळेवर पोहोचलो नाही, तर संचितचं नुकसान होऊ शकतं…"
संध्याकाळच्या तिरक्या उन्हात ते सगळे चांभाराच शेत, रातांबे, पार करत करत गावाच्या शेवटची वेस ओलांडतात आणि अंधाऱ्या, थोड्या थरकाप उडवणाऱ्या रुपणीच्या जंगलात प्रवेश करतात.
रुपणीतली झाडं, हवा आणि दूरवर ऐकू येणारे विचित्र आवाज – या सगळ्यांमुळे मुलांची भीती आणखीनच वाढते.संचितचा हात प्लास्टरखाली अजूनही दुखत असतो. कधी कधी अंगठी चमकताना दिसते.
अचानक, ओवलीचं झाड दिसतं.
तेच झाड, ज्यावरून संचित घसरून पडला होता!
धोंडूबाबा झाडाजवळ थांबतात आणि जमिनीवर काहीतरी शोधतात. थोड्या वेळाने, एका झाडाच्या मुळांखाली लपलेली एक जुनी धातुची प्लेट सापडते, जिच्यावर काहीतरी कोरलेलं असतं.
"हे चिन्ह... हीच दिशा दाखवते," धोंडूबाबा गंभीरपणे म्हणतात.
ते चिन्ह एका दाट गुहेकडे नेणारा गुप्त मार्ग दाखवत असते.

सगळे हळूहळू पुढे सरकतात. संचितच्या हाताचा त्रास वाढायला लागतो. तो थोडाफार लटपटतो, पण यश, मयुर आणि दिप्तेश त्याला आधार देतात.
शेवटी त्यांना एक छोटी, पण गडद तोंड असलेली गुहा सापडते.
त्यातून आत थंडावा आणि एक विचित्र कुबट वास येत असतो.
"हीच ती जागा," धोंडूबाबा म्हणतात.
"जिथं अंगठीचा जन्म झाला होता…"
सगळे दडपणात पुढे सरकतात. आत जाण्यासाठी त्यांना एक एक करून अरुंद उंबऱ्याखालून वाकून जावं लागतं.
गुहेत प्रवेश करताच संचितच्या हातातून प्रकाशाच्या लहरी बाहेर येऊ लागतात, जणू अंगठीला या जागेची ओळख पटली असावी!
पण... अचानक जमिनीचा कंपन सुरू होतो!
गुहेतून एक गडगडाट आवाज येतो –
"कोण आलंय इथे? कोण भूतकाळ जागं करतंय?"
सगळे दचकून थांबतात...
लेखक: प्रतिक देवराज महाडिक
ग्रामीण जीवन, रहस्य आणि मनोवैज्ञानिक कथा हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.
अधिक कथा वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट देत रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा