गावातील कवड्याचं रहस्य एक गुढ कथा!!
निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक टुमदार गाव होतं. चारही बाजूंनी हिरवाईनं वेढलेलं, आणि गावातून बाराही महिने वाहणारी एक स्वच्छ, नितळ नदी! गाव चार वाड्यांमध्ये विभागलेलं होतं, आणि प्रत्येक वाड्यात आपलं वेगळं रंगतदार विश्व होतं. लोक साधे, हसरे, एकमेकांच्या मदतीला तत्पर.
या गावाच्या एका वाडीत सिद्धेश नावाचा एक तरतरीत, उत्साही तरुण राहत होता. वयाने तरुण पण डोकं शांत आणि उत्सव म्हटलं की पहिल्यांदा हजर. गावात कुणाचाही कार्यक्रम असो, सिद्धेश पहिला पुढे!
त्या दिवशी गावात एका मित्राच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम होता. झगमगते दिवे, ढोल-ताशा, आणि बेंजोची धमाल! मुलं-मुली, लहान-थोर सगळेच नाचायला लागले. अंगणात, चावडीवर, अगदी देवळासमोरच्या चौथऱ्यापर्यंत सगळीकडे हळदीचा रंग चढलेला.
रात्री दीड-दोन वाजेपर्यंत नाच, गाणी, मस्ती सुरू होती. शेवटी साडेतीनच्या सुमारास सगळ्यांनी विश्रांती घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी लग्न होतं ना! म्हणून सिद्धेश आणि त्याचे मित्र देवळासमोरच्या चौथऱ्यावर झोपायला गेले.
सगळे डुलकी घेत होते, आणि अचानक सुमारे वीस मिनिटांनी सिद्धेशच्या पाठीमागे काहीतरी हलल्यासारखं वाटलं. त्याने डोळे उघडले. अंधार होता, पण देवळाच्या समोर असलेल्या पिवळसर दिव्याच्या उजेडात त्याला काहीशी सावलीसारखी हालचाल दिसली.
सिद्धेशने डोळे चोळले आणि परत पाहिलं... काहीच नव्हतं.
"काय झालय रे?" – मागून झोपेतूनच मित्र प्रवीणने विचारलं.
"काही नाही रे… पाठीमागे काहीतरी स्पर्श झाल्यासारखं वाटलं," सिद्धेश म्हणाला, थोडासा चपापलेला.
"बघ बाबा, रात्रीच्या वेळेला इथं झोपणं म्हणजे… त्या गुपचूप सावल्यांची जागा असते!" असं म्हणत दुसरा मित्र, मयूर, अर्धवट झोपेत हसत हसत बोलला.
सगळे परत शांत झोपले. पण सिद्धेशचं मन कुठेतरी अडकलं होतं. तो उठून बसला. त्याच्या लक्षात आलं की त्याच्या झोपलेल्या चटईखाली काहीतरी आहे… लाकडाचा छोटा डबा!
"हे काय?" त्याने दबक्या आवाजात विचारलं.
तो डबा उचलून त्याने उघडला… आणि मग सुरू झाला गावातला खऱ्या अर्थाने गोंधळ!
सिद्धेशने तो लाकडी डबा उघडला. डब्याच्या आत एक जुनीशी गुंडाळी होती – जणू एखादी पोतडी. त्याने ती हळूहळू उघडली… आणि आत दिसली एक पिवळसर रंगाची छोटी चिठ्ठी आणि त्यासोबत एक पितळी कवडं.
"हे काय आहे?" तो स्वतःशीच कुजबुजला.
चिठ्ठीवर जुनाट अक्षरात काहीतरी लिहिलं होतं.
थोडंसं अस्पष्ट, पण वाचता येत होतं:
"जी शोधेल, तीच उकल करेल. पण काळजी – कारण कवड्याच्या मागे सावली आहे!"
हे वाचून सिद्धेश एक क्षण गोंधळला. त्याने ती कवडं उचलली. ती स्पर्शात थोडी गरमच वाटत होती… आणि त्याच क्षणी देवळामागून कुत्रं जोरात भुंकू लागलं!
“काय रे झालं?” – प्रवीण आणि मयूर उठून बसले.
सिद्धेशने त्यांना डबा, चिठ्ठी आणि कवडं दाखवलं.
“हे कुठून मिळालं तुला?” मयूरने थोडं गंभीर होऊन विचारलं.
“चटईखाली होतं… कुणीतरी मुद्दाम ठेवलं असावं असं वाटतंय,” सिद्धेश म्हणाला.
तेवढ्यात मुळात शांत असलेला देवळाचा मागचा भाग थोडासा कुजबुजल्यासारखा वाटला. वाऱ्याची झुळूक जणू एखादा संदेश घेऊन येतेय, असा भास होत होता.
“हे काहीतरी वेगळंच आहे… मला आजोबांकडून ऐकलेली गोष्ट आठवतेय,” प्रवीण म्हणाला. “आपल्या गावात एक ‘कवड्याचं रहस्य’ होतं म्हणे… ज्याच्या हाती ती खास कवडं लागेल, त्यालाच गावाच्या जुन्या गुपिताचा धागा सापडतो...”
“पण सावली? ही सावली कोणाची?” – सिद्धेशचा चेहरा गंभीर झाला.
त्याच वेळी चंद्र ढगांआड गेला आणि अंधार आणखीन गडद झाला.
लेखक: प्रतिक देवराज महाडिक
ग्रामीण जीवन, रहस्य आणि मनोवैज्ञानिक कथा हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.
अधिक कथा वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट देत रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा